आठ वर्षाच्या प्रत्युषची श्रीराम भक्ती; खाऊचे पैसे मंदिरासाठी अर्पण


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मातीच्या गोळ्याला जसा आकार देऊन, तसे भांडे त्यातून घडत जाते. असेच लहान मुलांचेही असते. कुटुंबातील संस्कारी वातावरणाचा परिणाम मुलांवरही होतो, याचा प्रत्यय अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातील प्रत्युष उदयकुमार भणगे या ८ वर्षाच्या बालकाने दिला. आई-वडिल व आजी-आजोबांनी खाऊसाठी दिलेले तसेच आल्या-गेल्या नातेवाईकांनी भेट म्हणून दिलेले तब्बल 2 हजार 736 रुपये त्याने स्वतःहून अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देणगी म्हणून दिले. अर्थात कुटुंबियांनी आधीच ११ हजार १११ रुपये दिले होते. पण प्रत्युषनेही हट्ट करीत मलाही राम मंदिरासाठी पैसे द्यायचेच व माझ्याकडे जमलेलेच आहेत तेवढेच द्यायचे, असे सांगितल्याने आजी-आजोबांनी प्रोत्साहन दिले व त्याने पिगी बँकेत साठवून ठेवलेले ते पैसे देणगी म्हमून राम सेवकांकडे सुपूर्द केले. हे करताना कोणत्या प्रकारच्या किती नोटा आहेत व किती सुट्टी नाणी आहेत, याचे विवरणही त्याने वहीत लिहून तो कागदही देणगी स्वीकारणारांकडे सुपूर्द केला.

कर्जत येथील स्टँम्प व्हेंडर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य अरुण भणगे यांचा प्रत्युष हा नातू व भिस्तबाग चौकातील अरुणोदय औषधालयाचे संचालक उदयकुमार भणगे यांचा मुलगा. आजी उषा भणगे व आई वर्षा भणगे यांच्या मदतीने प्रत्युषने पिगी बँकेत स्वतःचे पैसे साठवले होते. तो गॅलेक्सी नॅशनल स्कुलमध्ये दुसरीला आहे. शाळेत मिळालेल्या यशाचा आनंद पालकांकडून व नातेवाईकांकडून त्याला खाऊसाठी पैसे देण्यातून होत असल्याने ते पैसे त्याने साठवून ठेवले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी सावेडीतून देणगी संकलनाची चर्चा भणगे यांच्या घरी नेहमी सुरू असायची. त्यासंदर्भात बैठकाही होत असायच्या. यादरम्यान आजोबांनी कर्जतमध्ये देणगी दिली व त्याचा फोटो त्याने पाहिल्यावर त्यालाही अशी देणगी देण्याची इच्छा झाली व त्याने ती आईकडे बोलून दाखवली. त्याची ही आगळीवेगळी इच्छा कुटुंबाने उचलून धरली व तुझ्या पैशात आणखी काही भर घालून आपण देऊ, असे सांगितल्यावर तुमचे पैसे नकोत, माझे जेवढे जमले, तेवढेच द्यायचे आहे, असे सांगून त्याने पिगी बँक फोडली व त्यात असलेले पैसे मोजून त्यांचा हिशेबही त्यानेच करून २७3६ रुपये द्यायचे असल्याचे सांगून टाकले. त्यानंतर कुटुंबियांनीही त्यास तयारी दाखवली. सावेडीतील विवेकानंदनगर-सिद्धीविनायक वस्ती (अहिल्यानगरी) निधी संकलन प्रतिनिधी श्रीराम जोशी यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुलदीप कुलकर्णी तसेच उषा व अरुण भणगे आणि वर्षा व उदयकुमार भणगे उपस्थित होते. लहानग्या प्रत्युषच्या या रामप्रेमाचे तसेच खाऊ-खेळणीचे पैसे देणगी म्हणून देण्याची दानत दाखवण्याच्या वृत्तीचे सर्वांनीच कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post