'देश हा देव असे माझा' : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त व्यक्त झाले अनोखे प्रेम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमीजीवांचा दिवस मानला जातो. एकमेकांना गुलाबाची फुले देऊन प्रेम व्यक्त करणे व आयुष्यभर एकमेकांना साथसंगत करण्याच्या आणाभाका घेण्याचा हा क्षणही मानला जातो. पण प्रेम फक्त प्रेमीजीवांचेच असते, असे नाही. आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी असा नातलगांसह ज्या भूमीत जन्म घेतला व लहानचे मोठे होऊन जीवनध्येय साध्य करण्याचे प्रयत्न सुरू केले, त्या देशावरही प्रेम करता येते व ते अनोख्या पद्धतीने व्यक्तही करता येते, हे अहमदनगरच्या जागरूक नागरिक मंचाने रविवारी दाखवून दिले. देशप्रेम हेच सर्वश्रेष्ठ प्रेम आहे व समाजातील जातीयवाद नष्ट करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याची गरज शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याच्या साक्षीने व्यक्त करीत अनोखा व्हॅलेंटाईन साजरा केला.

जागरूक नागरिक मंचातर्फे शहीद भगतसिंग उद्यानात व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वांनी देशावर प्रेम व्यक्त करीत जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन संस्थापक-अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा.सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्षद शेख व डेव्हिड चांदेकर यांना एकाच मंचावर बोलावून त्यांच्या हाती तिरंगा व गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. भारत मातेच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सुहास मुळे म्हणाले की, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवसी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर आपल्या देशावर प्रेम व्यक्त करा. सध्या जातीयवादाच्या किडीने संपूर्ण भारतास पोखरले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या किडीला मुद्दाम खतपाणी घालत जातीयवादाचा रोग पसरवत जाती-धर्मात फुट पाडून राज्य करीत आहेत. याला आपण नागरिकांनीच छेद दिला पाहिजे. शहीद भगतसिंगांसारख्या अनेकांनी देशावर प्रेम व्यक्त करीत बलिदान केले व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श घेवून हम सब है भाई भाई.. या संकल्पनेने देशावर प्रेम व्यक्त करून एकत्रितपणे या जातीयवादाला समूळ नष्ट करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाच्या संस्कृतीत कोठेही जातीयवाद नाही, त्यामुळे शेकडो वर्षे हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र, राजकीय पक्ष आपल्या-आपल्यात भांडणे लावत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी देशावर प्रेम व्यक्त करीत हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई....हम सब है भाई-भाई.... हा नारा पुन्हा एकदा देवून जातीयवाद नष्ट करू, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा.सुनील पंडित, अर्षद शेख यांनी चांगला संदेश देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी एक राहण्याचे आवाहन केले. यावेळी जागरूक नागरिक मंचच्या सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post