प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावाने कर्ज घेण्याचा प्रयत्न; टोळीचा पर्दाफाश
एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या टोळीने प्रथम डॉक्टरांच्या नावे सिम कार्ड मिळविले, त्यानंतर इमेल आयडी तयार केला. पुढे याच मेलआयडीच्या आधारे बनावट कागदपत्रे बजाज फायनान्स कंपनीला पाठवून पन्नास लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पडताळणीत हे पितळ उघडे पडले. डॉक्टांरनी तक्रार केल्याने पोलिसांना या टोळीचा छडा लावून चौघांना अटक केली.

तेजस प्रमोद मोगले (वय ३२ रा. सिडको महानगर औरंगाबाद), शुभम रमेश नंदगवळी (वय २६ रा. गुलमंडी, औरंगाबाद), अमोल सतीश सोनी (वय ३३ वर्षे रा. बसवंत नगर देवळाई, औरंगाबाद) व सतिष बापु खांदवे (वय २७ रा. वाकोडी, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

आरोपींनी अहमदनगर शहरातील एका डॉक्टरच्या नावाने प्रथम एका मोबाइल कंपनीकडून सिमकार्ड मिळविले. त्या आधारे त्या डॉक्टरांच्या नावानेच इ मेल आयडी तयार केला. मग कर्जप्रकरणासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे तयार केली. ती मेलद्वारे बजाज फायनान्स कंपनीकडे पाठवून पन्नास लाखांच्या कर्जाच्या मागणी केली. कंपनीकडून ही माहिती खऱ्या डॉक्टरांना समजली. त्यानंतर आपल्या नावाने कोणी तरी हा प्रकार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

सायब क्राइम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना तो मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडीच्या आधारे तांत्रिक तपास सुरू केला. पथकाने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्यातून या आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली. आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल आणि अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, योगेश गोसावी, उमेश खेडकर, मलिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अभिजीत अरकल, सम्राट गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post