जरे हत्याकांड : बोठेला शोधू कुठे.. कुठे; पोलिसांची नवी दोन पथके


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या शोधार्थ अजून दोन पथके पोलिसांनी नियुक्त केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करीत आहेत व कोणालाही उपोषणाची बसण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

रेखा जरे हत्याकांडाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पाच आरोपींच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच तपासी अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर येथील न्यायालयामध्ये बोठे याला फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे येत्या शुक्रवारी (५ मार्च) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. बोठेचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याची त्याची मागणी आहे. उपोषणावर तो ठाम असल्याने पोलिसांनीही बोठेला शोधण्याच्या हालचाली आता अधिक गतिमान केल्या आहेत.

घटना घडल्यापासून आरोपी पसार झालेला आहे. त्याचा शोध लागला तयार नाही. या अगोदर पोलिसांनी पाच पथके नियुक्त केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये ती संख्या दोनवर आली होती. आता पुन्हा नव्याने तपासाला गती देण्याचे आदेश दिले असून, दोन पथके नियुक्त केले आहे. या हत्याकांडाचा तपास पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करत आहे. तपास योग्य दिशेने होत असल्यामुळे आरोपी सुद्धा लवकर सापडेल. यासाठी आम्ही पथके वाढवली आहेत. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, आम्ही योग्य पद्धतीनेच तपास करत आहोत, ही बाब सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

ती गाडी मिळणार परत
रेखा जरे यांची ज्या सेंट्रो कंपनीच्या कार मध्ये हत्या करण्यात आली होती, ती कार ताब्यात मिळावी यासाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल याने न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने ही कार त्याच्या ताब्यात देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्या कारला कुठलाही नवीन कलर देण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कारमध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन बदल करण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यकता भासल्यास रुणाल याला ती कार न्यायालयासमोर हजर करावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post