वडिल झाले सभापती.. महापालिकेत रंगला कौटुंबिक जिव्हाळा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शेतकरी कुटुंबातील तो मुलगा अहमदनगर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सभापती होतो. दिवसभर बैलगाडीतून लोकांना पाणी वाटण्यात व्यस्त असलेल्या पित्याच्यादृष्टीने तो अभिमानाचा क्षण असतो. पण, काही राजकीय कारणाने अवघ्या चार-साडेचार महिन्यातच मुलाचा सभापतीपदाचा मुकुट खाली उतरतो. पण राजकीय अपरिहार्यतेला सन्मान देत मुलगा एक कौटुंबिक सोहळा मनपात रंगवतो व थेट पित्यालाच सभापतीपदाच्या खुर्चीवर बसवतो आणि स्वतः त्यांच्या मागे उभा राहतो. स्थायी समितीचे मावळते सभापती मनोज कोतकर यांनी नव्या सभापतीच्या आगमनाआधी आपल्या सभापतीच्या खुर्चीवर पित्याला बसवून त्यांचा अनोखा सन्मान केला व मनपातील आतापर्यंत झालेल्या पदाधिकाऱ्यांपैकी कोणीही आपल्या कुटुंबाला दिला नाही, असा अनोखा सन्मान देऊन साऱ्या महापालिकेला भावनिक केले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची चर्चा महापालिकेत सध्या सुरू आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर साडेचार महिन्यापूर्वी राजकीय खेळी खेळून (भाजपचे सदस्य असताना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करीत) सभापतीपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ बहरत असतानाच काही राजकीय कारणाने व मनपा स्थायी समितीच्या नियमाने त्यांना सभापतीपद सोडावे लागणार आहे. येत्या ४ मार्च रोजी नव्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मागील चार महिन्यापासून महापालिकेत आपण कोणत्या दालनात काम करतो, याचे दर्शन कुटुंबियांना घडवले. पारपंरिक शेतकरी वेषातील हे कुटुंब मनपात आले तेव्हा काही अधिकारी व कर्मचारी आवर्जून त्यांना पाहण्यासाठी आले. त्यानंतर सभापती कोतकरांनी वडिल शंकर कोतकर यांना आपल्या सभापतीपदाच्या खुर्चीवर बसवले व नंतर त्यांचा फेटा बांधून सत्कारही केला. वडिलांच्या अनोख्या सन्मानाचा हा क्षण उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गौरवला.

राजकीय व सामाजिक वाटचालीत अनेक पदे अनेकांच्या नशिबी येत असतात. मात्र, ही पदे मिळण्यापाठीमागे आई-वडिलांचे, मित्रपरिवारांचे व गणगोताच्या आशीर्वादाचे पाठबळ असते, हे नाकारता येत नाही. याच जाणिवेतून मनपा स्थायी समितीचे सभापतीपद भूषविणारे मनोज कोतकर यांनी आपल्या कर्तव्यशीलतेचे दर्शन घडविले. दोन दिवसात स्थायी समिती सभापतीपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने मनोज कोतकर यांनी आपण भूषवित असलेले पद, दालन आणि त्या कामाची ओळख आई-वडिलांना, मित्रपरिवार व गणगोताला कळावी, यासाठी महापालिकेत त्यांना घेऊन आले व आपल्याला मिळालेल्या खुर्चीवर काही काळासाठी वडिलांना बसविले. तसेच आई-वडिलांना आपण स्वतः करीत असलेल्या कामाची ओळख करुन दिली. यातून आई-वडिलांबद्दल असलेले प्रेम व आपुलकी दिसून आली. यावेळी उपस्थित सर्वजण भावूक झाले.

सभापती मनोज कोतकर हे शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. वडिलांनी शेतीबरोबरच बैलगाडीतून नागरिकांना पाण्याचे वाटप करण्याचे काम आजतागायत सुरू ठेवले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरु ठेवण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घेतला. सर्वांच्या सहकार्यातून सामाजिक कार्य सुरू करुन नगरसेवक पदाचा बहुमान मिळविला. त्यानंतर स्थायी समितीच्या पदावर सर्वांच्या आशीर्वादातून निवड झाली. दोन दिवसानंतर सभापतीपदाची मुदत संपत असल्याने वडील शंकर कोतकर, आई आशाबाई कोतकर, बहीण कल्याण लोखंडे यांच्यासह रावसाहेब मतकर, संतोष मतकर, हरिदास कोतकर, सुभाष कार्ले, मच्छिंद्र ठुबे, लक्ष्मण कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर आदींना नातलगांना बोलावून घेऊन चहा-पाण्याचा कार्यक्रम दालनात केला. या कार्यक्रमाची चर्चा सध्या महापालिकेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post