हिरण अपहरण व हत्याकांडाचा उलगडा; नोकरानेच काढला काटा!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय – 49) यांचे अपहरण, हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुकानातील नोकरानेच कट करून पैशांसाठी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातून पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिरण हत्याप्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या सागर गंगावणे व बिट्टू वायकर टोळीचा यात सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. मात्र, वायकर टोळीच्या अटक केलेल्यांची आरोपींना मदत झाली आहे काय? याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिदेषत दिली. यावेळी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपअधीक्षक संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे व गणेश इंगळे आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाèयांनी गुन्ह्याची उकल केल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली.

हिरण हे सोमवारी (1 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून बेलापूर येथून घरी श्रीरामपूरला दुचाकीवर निघाले होते. याच दरम्यान एका मारूती व्हॅनमधून त्यांचे अपहरण करण्यात आले. रविवारी (7 मार्च) त्यांचा मृतदेह वाकडी रस्त्यावर यशवंतबाबा चौकीनजिक आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने हा खूनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी खुनाचे वाढीव कलम लावले होते. या प्रकरणी बेलापूर व श्रीरामपूर येथे बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे हिरण यांच्या हत्येचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते.

गुन्ह्यात वापरलेली मोटार, मोबाईल, कागदपत्रे, धनादेश आदी वस्तू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मुख्य सूत्रधार आकाश खाडे, संदिप मुरलीधर हांडे (वय – 26, रा. माळेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय – 25, रा. सप्तश्रृंगीनगर, सिन्नर, जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (वय -26, रा. पास्तेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम (वय – 29, रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी आकाश खाडे हा हिरण यांच्या दुकानात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. हिरण हे दुकान बंद केल्यानंतर घरी पैसे घेऊन जातात. 15 ते 20 लाख रुपयांची ही रक्कम असते याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्यांचे पैसे लुटण्याचा कट 15 दिवसांपूर्वीच शिजला होता. याकरीता त्यांनी बेलापूर येथे पाळत ठेवली होती.

सोमवारी (1 मार्च) खाडे हा तिघा साथीदारांसह मारूती व्हॅन (क्र. एमएच 15, जीएल 4387) मधून बेलापूरला आला. तलाठी कार्यालयानजिक मोटार उभी केली. दोघे साथीदार दुचाकीवर आले. मात्र, त्यापूर्वीच हिरण हे दुकान बंद करून लवकर निघाले होते. त्यांनी आकाशला हटकले व काय करतो अशी विचारणा केली. त्यावेळी गाडी बंद पडल्याने त्याने पक्कड मागितली. हिरण यांनी शेजारीच असलेल्या गॅरेजमधून पक्कड दिली. गाडीजवळ हिरण येताच तिघांनी त्यांना बळजबरीने उचलून आत टाकले. त्यांच्याजवळील एक लाख 65 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आकाश याला हिरण हे ओळखत असल्याने पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाईल, अशी शंका आल्याने गाडीतच त्यांना मारून टाकले. जुनेद शेख याने त्यांचा गळा दाबला, तर गाडीचे दार आत ओढताना हिरण यांच्या डोक्याला मार बसला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद गोदामात नेले. रात्र झाल्यानंतर मृतदेह यशवंतबाबा चौकीजवळ टाकून पोबारा केला, अशी माहिती आरोपींनी पोलीस चौकशीत दिली.

Post a Comment

Previous Post Next Post