जरे हत्याकांड : आरोपी बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरूध्द शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार घोषित करावे यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असून, त्याची सुनावणी लवकरच होणार आहे. दरम्यान या संदर्भामध्ये तपास अधिकारी अजित पाटील यांनी बोठे याचा शोध लागलेला नसल्यामुळे आम्ही त्याला फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याचे स्पष्ट केले.

बोठे याच्या विरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे. या हत्याकांडास उद्या (दि.2 मार्च) तीन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, जरे यांच्या हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे, फिरोज राजू शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या पाच आरोपींना अटक केलेली आहे.

त्यांच्याविरोधात शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्यावर हल्ला करणार्‍या दोघांपैकी एकाचा फोटो जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघा आरोपींना तात्काळ जेरबंद केले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. पोलिसांना बोठे शोधूनही अद्याप सापडलेला नाही. याप्रकरणाचा पोलिसांनी विविध अँगलने तपास केला आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा व सत्र न्यायालयाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. पोलिसांनी बोठेच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केलेले आहे.

उद्या या घटनेला नव्वद दिवस पूर्ण होत असले तरी, आरोपी बोठे याचा तपास लागलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तपासी अधिकारी अजित पाटील यांनी न्यायालयामध्ये आरोपी मोठे याला फरार घोषित करावे यासाठी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे न्यायालयामध्ये फरार घोषित करण्यासाठी अर्ज आज पारनेर येथील न्यायालयामध्ये दाखल केला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे. पोलिसांनी अर्ज दाखल करताना आम्ही गेल्या तीन महिन्यापासून कशा पद्धतीने ह्याचा शोध घेतलेला आहे याची माहिती न्यायालयामध्ये सादर केलेली आहे. तसेच त्याच्या घराची झाडाझडती सुद्धा घेतलेली आहे. त्यासुद्धा बाबींचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. पथक पाठविण्यात आले आहे मात्र त्याचा सुगावा लागायला तयार नाही. त्यामुळे आता या आरोपीला फरार घोषित करावे म्हणून अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान याप्रकरणी रेखा जरे यांचा मुलगा रूनाल हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या या उपोषणामध्ये नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव हे देखील सहभागी होणार असून, उपोषणाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असतील असा अर्ज आढाव यांनी पोलिस अधीक्षकांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post