रेखा जरे हत्याकांड : मुख्य सूत्रधार बाळ बोठे अखेर ताब्यात; हैद्राबादमधून अटक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला हैदराबाद येथील बिलावलनगर मधील एका हॉटेलमधून सकाळी साडेसहा वाजता अटक केले. त्याला अटक करण्यासाठी नगर पोलिसांची सहा पथके त्या ठिकाणी दाखल झाली होती. नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये आतापर्यंत दहा आरोपींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसाच्या अथक परिश्रमानंतर बोठे याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला 102 दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीच्या दोनच दिवसात ज्ञानेश्‍वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे(श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हारबुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर बाळासाहेब जगन्नाथ बोठे (राहणार नगर), जनार्दन अकुला चंद्रप्पा (राहणार रामनगर हैदराबाद) यांना अटक करण्यात आली. पी अनंत लक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (राहणार हैदराबाद) हा फरार असून, राजशेखर अजय चाकली (वय 25, राहणार आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30, राहणार आंध्रप्रदेश),अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (वय 52, राहणार आंध्र प्रदेश), महेश तनपुरे (वय 40, राहणार सावेडी, नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे .

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापासून यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे हा फरार होता. पोलिसांना तो वेळोवेळी गुंगारा देत होता. आम्ही पंजाब, हरियाणा, चंदिगड, छत्तीसगड यासह भोपाळ अशा एकूण शंभर ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. मात्र तो सापडला नाही. पाच दिवसांपूर्वी तो हैदराबादमध्ये राहत असल्याची माहिती आमच्या पथकाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह सहा पथकांनी हैदराबाद येथे जाऊन त्याचा शोध घेतला. हैदराबाद मधील बिलाल नगर येथे तो एका लॉज मध्ये रूम नंबर 109 मध्ये आढळून आला. त्याच्या समवेत तेथील वकील अकुले जनार्दन व त्यांच्या इतर तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्हाला स्थानिक पोलीस, सायबर सेल, मुंबई क्राईम ब्रँच, सोलापूर क्राईम ब्रँच यासह विविध प्रकारच्या पथकांनी मदत केली. विशेष म्हणजे हैदराबादच्या सीआयडीने सुद्धा आम्हाला विशेष मदत केल्यामुळे त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. अनेक टेक्निकल बाबीने हा तपास केला असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. पाच दिवसांपासून हैदराबाद मध्ये असताना त्याने आम्हाला तीन वेळा गुंगारा दिला होता. मात्र आमची टीम त्याच्या मागावर होती. अखेरीस त्याला एका हॉटेलमधून पकडण्यात आले. विशेष म्हणजे बोठे याने हैदराबादमध्ये वेषांतर केले होते, असेही निदर्शनास आले आहे.

हैदराबादच्या ज्या ठिकाणी तो थांबला होता तेथे त्याला मदत करणारे करणारे वकील जनार्दन अकुले हे हैदराबादचे आहे. हैदराबाद मध्ये अकुले जनार्दन यांनी या अगोदर विविध गुन्ह्यातील आरोपींना मदत केले असल्याचेही तपासामध्ये पुढे आलेले आहे. बोठे याने त्याच्याकडील असलेले फोन वापरले व तो इतरांच्या संपर्कात होता. ते फोन आम्ही हस्तगत केले आहे. आम्ही तपास करताना कुठल्याही प्रकारचा संशय जरी आला तरी त्या ठिकाणी आम्ही जाऊन तपास केलेला आहे. या तपासामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप आम्हाला झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोपनियतेचा भंग होऊ नये म्हणून आम्ही काही बाबी सांगत नव्हतो. असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. ज्या भागातून आम्ही आरोपीला अटक केली त्या भागांमध्ये सर्वसामान्यांना जाता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. मात्र स्थानिक पोलिसांची मदत घेऊन ही कारवाई केली आहे. पाच दिवस आमच्या सहाही पथकाने अथक परिश्रम घेऊन ही कारवाई केली व त्याला यश आले आहे, असे म्हणावे लागेल. सायबर सेल तसेच टेक्निकल पथकाने सुद्धा योग्यरीत्या तपास केला. त्यामुळे आम्हाला आरोपींपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांची मोठी मदत झाली आहे. फरार आरोपी यांच्यासमवेत एक महिला सुद्धा आहे. मात्र तिचा या प्रकारची काय संबंध आहे का नाही याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आरोपी बोठे याला नगरच्या महेश तनपुरे यांनी सातत्याने संपर्क करत मदत केली, पैसे पुरवले व माहिती पुरवली असेही आता तपासामध्ये उघड झालेले आहे. त्याचा पहिल्यापासून त्याच्याशी संपर्क होता, असेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

आरोपी बोठे ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे त्याने त्याच्या जवळ असलेले बी. बी. पाटील नावाचे ओळखपत्र दाखवलेले होते. तो ज्या रूम नंबर 109 मध्ये राहत होता तेथे त्याने बाहेरून कुलूप लावून घेतले होते. जेणेकरून पोलिसांना कुठलाही संशय यायला नको, पण पोलिसांनी मात्र तो तेथेच असल्याचे लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा ताबा घेतला, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post