संवेदनशीलता दाखवून तातडीने उपाययोजना करा, अन्यथा..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना रुग्नांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे रूग्णसंख्या व बेडची उपलब्धता यात मोठी तफावत दिसून येत आहे. रुग्णांसाठी बेड मिळविताना नातेवाईकांची वणवण सुरु आहे. बेड न मिळाल्याने उपचाराअभावी एका रुग्णाला प्राण गमवावे लागले आहे. जिल्हा प्रशासन बेडची संख्या वाढविल्याचे सांगत असले, तरी ऑक्सिजन बेडची मात्र मोठी उणीव आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. रुग्नांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनातील अधिकार्‍यांनी आता संवेदनशीलता दाखवून मागील वर्षीप्रमाणे ऑक्सिजन सुविधा असलेले बेड तात्काळ उपलब्ध करावेत. अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला आहे.

कळमकर यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन उपाययोजनांमधील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. बेडची माहिती रुग्णांना मिळावी, यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. रुग्नांच्या सुविधेसाठी कक्ष कार्यान्वित झाला असला, तरी या ठिकाणी अद्ययावत (अपडेटेड) माहिती उपलब्ध नाही. तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष केल्यास स्थानिक पातळीवर अपडेटेड माहिती तत्काळ मिळू शकते व ग्रामीण भागातून रुग्णांना नगर शहरात आणण्याऐवजी त्यांना स्थानिक पातळीवरच वेळेत सुविधा मिळू शकते. ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेत माहिती मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी थेट नगर शहरात आणले जात आहे. शहरात आधीच बेडची संख्या पुरेशी नसल्याने काहींना वेळेत बेड न मिळाल्याने उपचाराआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचीही घटना घडलेली आहे.

शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असताना त्या प्रमाणात प्रशासनाकडून बेड उपलब्ध होत नाहीत. मागील वर्षी प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना होऊन ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये, यासाठी आयसोलेशन बेडला ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यादृष्टीने प्रशासनाने आता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन आवश्यक असतानाही वेळेत मिळत नाही. इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी शहर व तालुकास्तरीय व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

नगर शहरात खाजगी रूग्णालयांकडून आकारण्यात येणार्‍या बिलांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या बिलांची तपासणी करण्यासाठी व जादा बिले आकारणार्‍यावर कारवाईसाठी शासनाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. मागील वर्षी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली होती. यंदा जिल्हाधिकार्‍यांनी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केली असली, तरी बिलांची तपासणी करण्याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांना सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महापालिकेकडून बिलांची तपासणी, जादा बिलांच्या रकमा परत करण्याबाबत अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे रुग्णांना, नातेवाईकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना रुग्णांच्या एचआरसीटी टेस्टसाठी मोठी गर्दी झालेली आहे. त्यासाठी खासगी सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. मनपाला दीड वर्षांपूर्वी सीटी स्कॅन-एमआरआय मशिनसाठी निधी मिळाला होता. मात्र, प्रशासनाच्या हलर्गीपणामुळे ही मशिन अद्यापही कायर्र्रत झालेली नाही. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी, महापालिकेला मिळालेल्या निधीतून एमआरआय-सीटीस्कॅन मशिनची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी मागणीही कळमकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषयक आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून 30 टक्के निधी खर्च करण्याची मुभा दिली आहे. ‘ब्रेक द चेन’ नियमावली जाहीर करताना जवळपास 3300 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातून नगर जिल्ह्याला मिळालेल्या निधीतून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व भविष्यातील संभाव्य रूग्णवाढ लक्षात घेऊन विस्तारित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.

जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना, नियोजन केले जात असले, तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन रुग्णांना, नातेवाईकांना माहिती मिळण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, जर आवश्यक प्रमाणात बेड उपलब्धच नसतील, तर नियंत्रण कक्षातून प्रश्न मार्गी लागेल, असे दिसत नाही. यासाठी प्रशासनाने प्राधान्यायने ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याबाबत युध्दपातळीवर व ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा या संदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या सर्व नियमावलींना पक्ष म्हणून शिवसेनेचे कायम सहकार्य राहिले आहे. मात्र, सध्याच्या गंभीर व संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातील अधिकार्‍यांनीही संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहनही कळमकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post