एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
आज करोना नामक विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरडा खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे ही करोना संसर्गाची प्रमुख लक्षणं आपल्याला माहीत आहेत. मात्र आता काही करोना रुग्णांमध्ये ही लक्षणं न दिसता इतर लक्षणं, जसे की, त्वचेच्या समस्या दिसून येतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळजवळ ४० टक्के रुग्णांना त्वचासंबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्वचेची काही लक्षणे संसर्गानंतर लवकरच दिसून येतात, तर अनेक रुग्णांना करोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांनी या समस्या जाणवू शकतात. यामध्ये खालील प्रकारच्या त्वचेच्या समस्यांचा समावेश होतो.
१) मॅक्युलोपॅप्युलर रॅश
हे लक्षण सर्वाधिक रुग्णांमध्ये दिसून येते. यामध्ये करोना विषाणू नसा आणि धमन्यांपर्यंत पोहोचल्यामुळे त्वचेवर सूज येऊन लहान व चपटे पुरळ येतात. यामध्ये वेदनेसोबतच खाजही येते. करोनाची इतर लक्षणं दिसू लागल्यानंतर जवळपास आठ दिवसांनंतर हे पुरळ दिसेनासे होतात. मॅक्युलोपॅप्युलर रॅश अधिक गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
२) कोविड टोज
सर्वात पहिलं करोना रुग्णांमध्ये दिसून आलेले त्वचेवरील लक्षण म्हणजे कोविड टोज. हे लक्षण आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत ज्या वेळी करोनाची खोकला-ताप अशी दुसरी लक्षणं दिसत नाहीत तेव्हा दिसते. हात आणि पायांच्या त्वचेवर लाल किंवा जांभळ्या रंगाचे दाणेदार पुरळ येतात आणि त्यांना खाज येते. कधी कधी त्यात वेदनादेखील होतात. विशेषत: कमी वयाच्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
३) सुकलेले ओठ
ओठांचे जास्त कोरडे होणे करोनाच्या नवीन लक्षणांपैकी एक आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ओठ खूप सुकल्याने तोंडाच्या आतही याचा त्रास होऊ शकतो. भरपूर पाणी न प्यायल्याने तसेच पौष्टिक आहार न घेतल्यानेही ही समस्या होऊ शकते. संक्रमणाच्या सुरुवातीला ओठ शुष्क होतात आणि ओठांवर स्किन जमा होते.
४) पाणी भरून येणारी पुरळ
यामध्ये लहान लहान आकाराचे दाण्यास्वरूपाचे पुरळ शरीराच्या कोणत्याही भागावर (विशेषत: शरीराच्या मागच्या भागावर आणि गुप्तांगावर) दिसून येतात. आजार गंभीर झाल्यास यामध्ये रक्त साठू लागतं आणि पुरळ फुटतात. तसंच यांचा आकारही वाढतो आणि ते पसरू लागतात. हे मध्यमवयीन लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात.
५) पित्तासारखे चट्टे
करोना रुग्णांमध्ये दिसून येणारी आणखी एक त्वचेची समस्या म्हणजे पित्तासारखे चट्टे. यामध्ये शरीराच्या बहुतेक भागावर जखमेसारखे पुरळ दिसून येतात. त्यांचा रंग सामान्यपणे पांढरा किंवा गुलाबी असतो. ही लक्षणे जवळजवळ करोनाच्या इतर लक्षणांच्या आठ ते दहा दिवसांनंतर दिसतात.
६) लिव्हिडो
जेव्हा त्वचेत रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन प्रवाह कमी होतो आणि त्या नीट कार्य करत नाहीत तेव्हा असे लिव्हिडो स्किन रॅशेज दिसून येतात. ही लक्षणं करोनाच्या वयस्कर रुग्णांमध्ये दिसून येतात, ज्यांना आधीपासूनच हृदय किंवा फुप्फुसांचा त्रास आहे.
७) त्वचा अधिक संवेदनशील होणे
करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांची त्वचा संवेदनशील होते. त्वचा कोरडी झाल्यामुळेदेखील संवेदनशीलता अधिक वाढते.
८) केस गळणे
करोनाच्या संसर्गानंतर दोन ते तीन महिन्यांत केस गळती होण्यास सुरुवात होते. याला ‘टेलोजेन इफ्लुव्हियम’ असेही म्हणतात. तणावाच्या वेळी शरीर अनावश्यक क्रियांना बंद करते. त्यामुळे यादरम्यान केस अधिक कमकुवत होतात आणि काही काळाने गळायला लागतात. अशा प्रकारची केसगळती फक्त करोनापुरती मर्यादित नसून बऱ्याच आजारांमध्ये दिसून येते. जर रक्तातील लोहाची पातळी प्रमाणात असेल, तर केस वेळेत बरे होतात.
९) कोविड नखे
कोविड-१९ संक्रमणानंतर लोकांना बरीच लक्षणे आढळणाऱ्या नवीन लक्षणांपैकी नखांमध्ये ओळी आणि खोबणी दिसणे हे एक लक्षण आहे. याला ‘कोविड नखे’ असेही संबोधले जाते. यामध्ये नखांवर आडव्या ओळी तयार होतात ज्याला ‘ब्युज लाइन्स’ असेही म्हणतात. हे कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे, दुखापतीनंतर किंवा मूलभूत आरोग्याच्या स्थितीमुळे उद्भवू शकते.
Post a Comment