मार्गशीर्षातला पहिला गुरूवार; घट मांडणी, स्थापना, पूजा विधी कशी करावी?


एएमसी मिरर वेब टीम 

ऑनलाईन न्यूज 

यंदाच्या वर्षी ९ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरूवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपास धरतात. एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. एकूण चार गुरूवारी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. लक्ष्मी मातेची पुजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. कुमारिका आणि सुहासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात. ९ डिसेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरूवार आहे. चला तर मग यंदाच्या मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरूवारी वैभलक्ष्मी घट मांडणी, स्थापना, व्रताची पूजा विधी कशी करावी?

मार्गशीर्षातल्या गुरूवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. सुद्धा शेजारपाजारच्या सवाष्ण स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करत वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. या व्रतासाठी नेमकी कशी तयारी करावी, पूजा कशी करावी, स्थापना कशी करावी, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मार्गशीर्ष गुरूवार 2021 व्रताची संपूर्ण माहिती…

मार्गशीर्ष गुरूवार व्रतासाठी घट मांडणी कशी करावी ?

पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चारहीबाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कळश ठेवावा. कळशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे. कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.

मार्गशीर्ष गुरूवार व्रताची पूजा कशी करावी ?

लक्ष्मीसमोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे. पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी.

मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे नियम :

शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. हे व्रत करणार्‍या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं. व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं. पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवावी. मात्र उपास स्वत: करावा. लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्यचा पाठ करू शकतात.

शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात. या कथेतून अनेक गोष्टी सुचित केल्या जातात त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. संपत्ती, सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उन्मत्त झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते हे यात सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post